‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा!’ असं आपल्या महाराष्ट्राचं काव्यात्मक वर्णन केलं जातं. या पंक्तीत महाराष्ट्र-पुरुषाचं जे रांगडे रूपकात्मक वर्णन आलं आहे त्याचं मूळ इये देशीच्या सह्याद्री पर्वत आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे. हा सह्याद्री पर्वत महाराष्ट्राचा कणाच आहे. या डोंगररांगांतील गिरिशिखरांवर उभारलेल्या असंख्य गडकोटांचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. या गडकोटांवरूनच त्यांनी नूतनसृष्टी उभारली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंचे चरित्र आपण नीट अभ्यासले, तर असे लक्षात येते की शिवाजी महाराज आणि या किल्ल्यांचं एक अतूट नातं आहे. शिवरायांचा जन्म झाला एका किल्ल्यावर. त्यांचं कर्तृत्व बहरलं गडांच्या परिसरातच. त्याची पहिली राजधानी होती किल्ले राजगडावर. त्यानी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला तो रायगडावर आणि तेथेच त्यांचं महानिर्वाण झालं. केवळ विलक्षण योगायोगाच्या गोष्टी नव्हेत या!
समाजमाध्यमांतील प्रचारामुळे आणि या गड-किल्ल्यांच्या परिसरात उपलब्ध असलेल्या वाहतूक सुविधांमुळे आता गडावरती येणाऱ्या तरुणाईचा ओघ पूर्वीपेक्षा खूप वाढला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असली आणि त्यामुळे परिसरातील ग्रामीण लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे ही उत्साहवर्धक बाब असली, तरी त्यातून आता नवीन समस्या उद्भवू लागल्या आहेत. गडावर येणारी तरुणाई बहुतांश वेळा पिकनिकच्या मूड मध्येच येताना दिसते. विशेषकरून पावसाळ्यात मुंबई, लोणावळा, पुणे आदी शहरांच्या आसपासच्या किल्ल्यांवर, गडाचे पावित्र्य भंग करणाऱ्या घटनांचा अनुभव आताशा वारंवार येऊ लागले आहेत. गडावर येणाऱ्या हौशे-गौशे मंडळींचा परिसरातील ग्रामस्थांना थेट उपसर्गही होऊ लागला आहे.
त्यातूनच मग अतिसाहस आणि सेल्फी काढण्याच्या नादात अपघात होऊ लागले आहेत. गडावरील तोफा, वास्तू तसेच गडाचे इतिहासात असलेले महत्त्व याबद्दल पूर्ण अनभिज्ञ असणाऱ्या लोकांकडून उरलेसुरले वास्तुअवशेष यांची नासधूस करण्यापर्यंत मजल गेली आहे. रायगडासारख्या पवित्र ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या लोंढ्यांमुळे तेथील सर्व व्यवस्थांवर आणि सुरक्षेवर ताण पडताना दिसतोय. त्याचा परिणाम अर्थातच काय होतोय, यावर भाष्य न केलेलं बरं. लोणावळ्याजवळचे लोहगड-विसापूर किल्ले, भुशी धरण आणि कोरीगड परिसर, त्र्यंबकेश्वरजवळचा हरिहर, माथेरान जवळचा पेबचा किल्ला याठिकाणी अशा दुर्घटना गेल्या काही वर्षांत सातत्याने होताना दिसतायत. त्यावर कठोर उपाययोजना म्हणून सरकार, वनखाते यांच्याकडून त्या ठिकाणी जाण्यावर बंधने येऊ लागली आहेत. दुर्गभ्रमंतीला आलेले हे पिकनिकचे स्वरूप पाहून मन खट्टू होते.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राची अभिमानप्रतिके असलेल्या या किल्ल्यांवर जाताना मुळातच किल्ल्यांवर का जायचे? तेथे काय बघायचे ? तेथे वावरताना कोणत्या गोष्टींचे तारतम्य बाळगायचे ? कोणती पथ्ये पाळायची? यावर सर्वांनी विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. तशा प्रकारची आचारसंहिता बनवून प्रत्येकाला ती पाळण्याचे बंधनकारक करणं खरंतर आवश्यक आहे. पण तसं करणं शक्य नसल्याने निदान प्रत्येकाने किल्ल्यावर जाताना या गोष्टींची खबदरदारी घेतली तरी खूप झाले. त्यासाठीच हा छोटा लेखन प्रपंच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना प्राणप्रिय असलेल्या या किल्ल्यांवर जाताना ती आपली प्रेरणास्थाने आहेत, हा भाव मनात आणि तशी श्रद्धा उरात बाळगून त्यावर भ्रमंती करावी. शक्यतो ज्या किल्ल्यांवर जायचे आहे तो प्रदेश, तेथला भूगोल, आजूबाजूची गावे, किल्ल्यावरून दिसणारा निसर्ग, परिसरातील डोंगर, लेणी, किल्ले यांची माहिती घेऊन जावी. गडावर आज कोणते अवशेष शेष आहेत? गडाचा इतिहास काय सांगतो? त्यासोबत गडावरच्या वनसृष्टी, प्राणी-पक्षी जीवनाची माहिती, असा थोडा गृहपाठ करून मगच त्या किल्ल्यावर जावं. आपल्या बरोबरच्यांना त्या-त्या स्थळी जाऊन ही माहीती जरूर द्यावी. शक्य झाल्यास गडावर दुर्गसंवर्धनाच्या कार्यास हातभार लावून शिवकार्यात आपले योगदान द्यावे. गडावरील वास्तूंची छायाचित्रे, मोजमापे घेऊन त्याचे दस्ताऐवजीकरण करावे. गडाच्या पायथाशी किंवा गडावर असलेल्या गिरिजनांच्या वाड्या-वस्तीत जाऊन जमेल तेवढे समाजकार्यही करावे.
आजच्या तरुणाईने मनापासून हे ठरवलं तर प्रत्यक्षात ते येऊ शकतं. फक्त आपल्या इच्छाशक्ती आणि सारासार बुद्धीचा वापर त्यासाठी त्यांनी करणं गरजेचं आहे. असं केल्याने या दुर्गतीर्थाची तुमची ही भ्रमंती केवळ भोज्जा न ठरता ती एक डोळस आणि यादगार भटकंती ठरू शकते. शिवाय दुर्गभ्रमंतीच्या माध्यमातून आपल्याला नेतृत्वकला, निसर्गावलोकन, भटकंती, छायाचित्रण, आकाशनिरीक्षण, इतिहास, गिर्यारोहण, पक्षी-प्राणी अभ्यास असे अनेक छंद जोपासता येतात. आपल्या पूर्वाजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही स्थळे त्यातून तुमच्यासाठी अक्षय प्रेरणेचा स्रोत ठरतील. आपले शिवप्रेम हे बेगडी व पोकळ अभिमानाचा विषय न ठरता ते प्रत्यक्षात स्फूर्तीचे निधान ठरावं.
म्हणूनच आजच्या समस्त तरुणाईला हे कळकळीचं आवाहन आहे – ज्या ठिकाणी आपल्या पराक्रमी पूर्वजांनी रक्ताचे आणि घामाचे सिंचन करून आपले स्वातंत्र्य, अभिमान अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला, जेथे गेल्यावर आपली छाती अभिमानाने भरून येते; त्या स्थळी आपल्या कृती, उक्ती मुळे मान खाली घालावी लागेल, अशी परिस्थिती निदान पुढे भविष्यकाळात उद्भवू नये. यासाठी त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. आपले प्रत्येकाचे आता ते एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे.
ही पथ्ये अवश्य पाळा –
– किल्ल्यांवर गेल्यावर कसलेही गैरवर्तन होणार नाही, किल्ल्याचे पावित्र्य राखले जाईल याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
– कोणतेही व्यसन करणे हे निषिद्धच आहे आणि तसे कोणी करत असल्यास ते रोखावे.
– गतकाळात किल्ल्यांच्या आसमंतात फक्त तलवारीचा खणखणाट, तोफांचा धडधडाट आणि रणवाद्यांचा निनाद घुमला आहे हे लक्षात ठेऊन आपण गोंधळ, गडबड, गाणी बजावणे हे कार्यक्रम गडावर टाळायला हवेत.
– आपल्या हातून गडावरील ध्वस्तावशेषांना हानी पोहोचणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घ्यावी.
– गडावरील वास्तूंवर आपली नावे कोरून आपल्या अस्तित्वाच्या खुणा जगाला सांण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.
– ज्यांनी या वास्तू आपल्या रक्ताचे पाणी करून उभारल्या, जपल्या त्यांनी आपले नाव कोठेही त्यावर लिहिलेले नाही. निदान त्याचे तरी भान ठेवावे.
– आपला जीव धोक्यात घालून छायाचित्रण करण्याचा प्रयत्न करू नये.
https://www.facebook.com/photo.php?fbid=1963908386973555&set=a.792018840829188&type=3&permPage=1