peth hotel Koraimata Dhaba पेठ शहापूर येथील हॉटेल मालकाची मुजोरी

पेठ शहापूर येथील हॉटेल मालकाची मुजोरी’

नमस्कार मित्रांनो!
परवाच लोणावळ्यातील पेठ शहापूर या गावात आलेला अनुभव आपल्या सोबत शेर करीत आहे..

शालेय विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी, त्यातील धोके ओळखून सुक्षित व तंत्रशुद्ध डोंगरयात्रा कशी करावी, निसर्गाशी जवळीक साधताना त्याच्याशी प्रामाणिक राहून या साहसी क्रीडाप्रकाराचा निखळ आनंद कसा अनुभवायचा या हेतूने नियमितपणे मी डोंगर भटकंतीचे आयोजन करीत असतो.

त्याचाच एक भाग म्हणून परवा पेठ शहापूर या गावालगत असणाऱ्या ‘कोरीगड’ या नितांत सुंदर किल्ल्यावर पुन्हा जाण्याचा योग आला. सोबत मुलांचा छोटा संघ व आमचा डॉक्टर, गिर्यारोहक मित्र सुमित देखील होता सोबतीला. या गावात असणाऱ्या (बहुदा एकमेव) ‘कोराईमाता हॉटेल’ येथे दुपारच्या जेवणाची व्यवस्था होईल अशी माहिती एका मित्राद्वारे समजली. येथील हनुमान मंदिराला लागुनच हे हॉटेल(?) आहे. तेथे प्रत्यक्ष जाण्याच्या दोन दिवस आधी जेवण उपलब्ध होण्यासाठी फोनवर आगाऊ सूचना दिली, समोरून होकार मिळाला.

शनिवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास छोट्या बसने सर्वजण तेथे पोचलो. ट्रेक सुरु होण्यापूर्वी आमचा जेवणाचा प्रत्यक्ष आकडा या हॉटेल वाल्याला सांगितला. त्याने आमची गाडी सुरक्षित ठेवायची असेल तर हनुमान मंदिराच्या डावीकडील मोकळ्या जागेत लावण्याचा सल्ला दिला. आता, जेवणाची ऑर्डर ज्यांना दिली त्यांच्याच सुचनेनुसार आम्ही बस तेथे लावली देखील.

थोडयाच वेळात कोरीगाडाकडे कूच केली. गड भटकंती पूर्ण करीत मुलांना ठरवलेला अभ्यासक्रम शिकवून अपेक्षित वेळेप्रमाणे म्हणजेच दुपारी १.०० वाजता आम्ही ‘त्या’ हॉटेलमध्ये पोचलो. साधारणतः पुणे शहरात असतो त्यापेक्षा अधिक दराने मिळणारे येथील जेवण अतिशय सुमार दर्जाचे होते. जेवण वाढल्यानंतर मुलांना अजून काही हवे आहे कि नाही हे साधे विचारायलाही कोणी हजर राहिले नाही. अन्न वाया घालवायचे नाही म्हणून ते कसेबसे संपविण्याचा प्रयत्न केला..

हा सर्व विचित्र प्रकार कोणालाही अनपेक्षित वाटणारच होता. आमची हि नाराजी नम्रपणे तेथून काही अंतरावर बसलेल्या तेथील हॉटेल मालकास(?) बोलून दाखवली. तेव्हा त्याने दिलेले उत्तर, “आमच्याकडे आक्खं पुण-मुंबई येतं, सर्विस देतो आम्ही.. तुम्ही आमच्यावर बोट ठेवायचं नाही अजिबात!”

सकाळी घाटातून येताना एका विद्यार्थ्यास जरा गाडी लागली(उलटी) ती पुढील दाराजवळ. ती जागा स्वच्छ करण्यासाठी आमच्या वाहन चालकाने आमच्या उपस्थितीत बादलीत पाणी मागितले. तेव्हा थोडे पाणी देण्यासाठी पैसे लागतील असे सांगण्यात आले!

जेवणाचे पैसे देताना गाडी पार्किंग च्या नावाने २०० रुपये द्यावे लागतील असे त्या XXXX हॉटेल मालकाने सांगितले. “पण पार्किंग तर तेथील मंदिराच्या जागेत केले होते ना….?, ठीक आहे.., मग पावती द्या”, (हा आमचा सहाजिक प्रश्न). त्यावर त्याचे उत्तर, “ते पैसे आम्हीच गोळा करतो, पावती वगैरे काही नसते!”
आता मात्र मला राग आला, पण काही क्षणांपुरताच (कारण आपण आहोत सुसंस्कृत घरातले. त्यातही एक गिर्यारोहक व प्रशिक्षक! सहनशीलता व संयम जरा जास्तच अंगवळणी पडलेले असतो आपल्या!)

माणुसकी हि एक लोप पावत चाललेली गोष्ट आहे हे आपण सर्वच कधी तरी ऐकत असतो. पण अशा माणुसकी शून्य व मुजोर प्रवृत्ती आपल्या सह्याद्री रांगेत/ महाराष्ट्रात पहावयास मिळण्याचा माझ्या आजवरच्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग असावा.

वरील हॉटेल वाल्याचा तेथील मंदिराशेजारीच तासावर खोल्या देण्याचा व मद्य विक्रीचा धंदा देखील आहे असे कळले! (हा ‘सर्विस’ कसली देतो हे आता तुमच्या लक्षात आले असेल!)

तेव्हा माझ्या सर्व गिर्यारोहक, भटक्या मित्रांनो पुढच्या वेळी या परिसरात ट्रेकिंगसाठी जाताना सावधानता बाळगावी, यासाठीच हा लिखाण खटाटोप!  आपल्या सारख्या ग्राहक राजाला गृहीत धरून पैशाची मस्ती चढलेल्या अशा उन्मत्त प्रवृत्तींवर अंकुश आणण्याची वेळ आली आहे.

तुम्हालाही असाच अनुभव तेथे/ इतरत्र कधी आला आहे का हो?


Posted

in

by

Tags: