- This event has passed.
22nd Girimitra Sammelan
नमस्कार गिरिमित्रहो,
दरवर्षी जून महिन्यात आपण वाट पाहत असतो पावसाची आणि जुलै महिन्यात ‘गिरिमित्र संमेलनाची’! इतकं आपलं गेल्या २१ वर्षांचं घट्ट नातं आहे. म्हणूनच २२ व्या गिरिमित्र संमेलनाचे आमंत्रण देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
दि. १२-१३ जुलै २०२५ रोजी आपण भेटणार आहोत महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड पश्चिम येथील सभागृहात…
सह्याद्री, गडकोट, हिमालय, निसर्ग आणि पर्यावरण हे आपल्या सगळ्यांचेच जिव्हाळ्याचे विषय. या विषयांना आपण विविध माध्यमातून मांडणार आहोतच. याशिवाय विविध संस्था आणि कार्यकर्त्यांचा सन्मान, त्यांच्या कारकीर्दीचा आढावा, प्रस्तरारोहण छायाचित्र प्रदर्शन, प्रस्तरारोहण फिल्म, एका ऐतिहासिक नाटकाची झलक, मुलाखत, गिर्यारोहण साहित्याचे विविध स्टॉल असे नेहमीचे आवडीचे विषय आहेतच शिवाय डोंगर भटक्यांसोबत गळाभेट आणि गप्पा हेही आहेतच.
यंदाच्या २२ व्या संमेलनाची सहआयोजक संस्था आहे ‘दि नेचर लव्हर्स’, ५०व्या वर्षांत पदार्पण करणारी गिर्यारोहणातील एक अग्रगण्य संस्था. संमेलनात यावर्षी विशेष भर देण्यात येणार आहे सह्याद्रीतील प्रस्तरारोहण विषयावर. आणि म्हणूनच प्रस्तरारोहण क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे अशा उत्तुंग प्रतिभेच्या पाहुण्यांना आपण संमेलनासाठी आमंत्रित केलं आहे.
२२ व्या संमेलनाची प्रमुख अतिथी आहे प्रस्तरारोहण आणि आईस क्लायंबिंग मध्ये जागतिक स्तरावर आपला स्वतंत्र ठसा उमटवणारी जर्मनीची इनस पापर्ट.
– आईस क्लायंबिंग जागतिक विजेती
– अल्पायनिस्ट
– एम-११ च्या मिक्स क्लायंबिंग ग्रेडचे आरोहण करणारी जगातील पहिली महिला
– ८-बी ग्रेडचे क्लायंबिंग करणारी प्रस्तरारोहक महिला
– नोज रूटने अल कॅपिटनच्या उभ्या प्रस्तर भिंतीवर आरोहण करणारी महिला
२२ व्या संमेलनाचे विशेष अतिथी आहेत अतिउंचावरील हिमशिखरांवर मदत व बचाव कार्य करणारे नेपाळ मधील लक्पा शेर्पा.
– हेलिकॉप्टर लॉंग लाईन रेस्क्यू स्पेशालिस्ट
– एव्हरेस्ट-इआर क्लिनिक समन्वयक
– हिमालयन रेस्क्यू असोसिएशनच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पचा बेस कॅम्प मॅनेजर
– एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू, धवलागिरी, नुप्त्से या अतिउंच शिखरांवरील आव्हानात्मक जागेवर अडकलेले डझनभर जीव वाचवले आणि मृतदेह बाहेर काढले
– बेस कॅम्पवर २३ हंगाम कार्यरत राहिले (१७००० फूट उंचीवर ४ वर्षांहून अधिक काळ)
याव्यतिरिक्त, विविध सादरीकरणे आणि आढावा अहवाल सादर करण्यात येतील
– प्रस्तरारोहण फिल्म सादरीकरण
(आपल्या प्रस्तरारोहकांनी सह्याद्रीत आरोहण केलेल्या मोहिमांचे सादरीकरण)
– प्रस्तरारोहण छायाचित्र प्रदर्शन
(निवडक प्रस्तरारोहण मोहिमांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन)
गिरिमित्र संमेलन विशेष आढावा अहवाल –
1. प्रस्तरारोहण आणि हिमालय मोहिमा
2. बचाव (रेस्क्यू) व मदत मोहिमा
3. दुर्ग संवर्धन मोहिमा (निवडक)
हे सगळं अनुभवयाला, ऐकायला, बघायला भेटूया दि.१२-१३ जुलै २०२५
रोजी आपल्या नेहमीच्या हक्काच्या ठिकाणी.
संमेलनाची नोंदणी सुरु झाली आहे. संमेलन प्रवेशिका देणगी मूल्य रु. ८५०/- फक्त, ज्यामध्ये दि १२ जुलै – चहा, भोजन आणि दि १३ जुलै – चहा, नाश्ता, भोजन, चहा यांचा समावेश आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संमेलन प्रवेशिका वितरणात प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील.
देणगी प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण –
महाराष्ट्र सेवा संघ, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग,अपना बाजारच्या वर, मुलुंड (प), मुंबई – ४०००८०
वेळ: सोमवार ते शनिवार (सकाळी १०.३० वा ते सायं ७.३० वा), रविवार (सकाळी १०.३० वा ते १२.३० वा),
साप्ताहिक सुट्टी – गुरुवार
ऑनलाईन माध्यमातून देणगी प्रवेशिका मिळविण्यासाठी पाहा – https://girimitra.org/en/entry-pass-booking/
देणगी प्रवेशिकांबाबत अधिक माहितीसाठी संपर्क:
श्रीकर पिसोळकर – ९८६९७ ९०१४६, दिनेश ठोसर – ९३२०० ५१७५८
संमेलनमध्ये सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद द्या.
सर्व गिरिमित्रांना प्रेमाचं निमंत्रण
आपला डोंगरमित्र,
अभिषेक रमाकांत गुरव
संमेलन प्रमुख, २२ वे गिरिमित्र संमेलन