गिरिमित्रहो,
२१ व्या गिरिमित्र संमेलनाचं आमंत्रण देताना विशेष आनंद होत आहे. हे संमेलन म्हणजे डोंगर भटक्यांचं वार्षिक स्नेहमिलन. राज्यभरात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्था आणि दुर्गप्रेमींना एकत्र आणणारं व्यासपीठ. गिर्यारोहण क्षेत्रात धडाडीने काम केलेल्या आणि आजही करत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांचं कौतुक आणि सन्मान करण्याच हक्काचं ठिकाण.
महाराष्ट्र सेवा संघाच्या भक्कम पाठबळावर आता २१ वं संमेलन साजरं होतंय, ही आपणा सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. भटकंती, गडकिल्ले, हिमालयीन मोहिमा, निसर्ग अश्या अनेक विषयांवर स्पर्धा, तज्ञांचं मार्गदर्शन, लघुपट हे तर आपण अनुभवतोच, पण सर्वात मोठं आकर्षण असतं प्रमुख पाहुणे यांचं. कारण आजवर अनेक देशी विदेशी ज्येष्ठ गिर्यारोहकांनी आपल्या निमंत्रणाला मान देऊन या संमेलनाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. नुसती नावं आठवली तरी आपल्या भाग्याचा हेवा वाटतो. मार्क इंग्लिस, गेरलिंड कल्टेनब्रूनर, जॉन पोर्टर, अपा शेर्पा, कर्नल कुमार, मेजर अहलुवालिया, ब्रिगेडियर ॲबे, चंद्रप्रभा ऐतवाल, कामी रीता शेर्पा…
आणि आता २१ व्या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत, गिर्यारोहणाची देदिप्यमान कारकीर्द असणारे पोलंडचे ज्येष्ठ आरोहक ‘क्रिस्तोफ वैलेकी’ .
– १४ अष्टहजारी शिखरं सर करणारे जगातले पाचवे आरोहक.
– हिवाळी शिखर मोहिमांचा पायंडा पाडणारे आणि एव्हरेस्ट, कांचनजुंगा, ल्होत्से या शिखरांची प्रथम हिवाळी यशस्वी चढाई करणारे.
– २४ तासात एकट्याने ब्रॉड पीकची यशस्वी चढाई करणारे आणि वेगवान चढाईचा पायंडा पाडणारे.
– एकट्याने (सोलो) चढाई करून अनेक शिखर माथे वेगळ्या मार्गाने सर करणारे दिग्गज पोलीश गिर्यारोहक.
– अनेक सन्मान प्राप्त असलेले आणि गिर्यारोहणाचा सुवर्णकाळ गाजवलेले ‘क्रिस्तोफ वैलेकी’
२१ व्या संमेलनाचं दुसरं आकर्षण म्हणजे या संमेलनात विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ‘प्रवीणजी भोसले’. शिवकालीन घटनांचा सखोल अभ्यास करून त्यातील तथ्य सप्रमाण सिद्ध करणारे इतिहास अभ्यासक आणि वक्ते असणारे प्रवीणजी समाजमाध्यमांचा चांगला वापर करून आपले विचार आणि सत्य लोकांसमोर परखडपणे मांडण्याचा प्रयत्न करतात.
दि १३ व १४ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या या दीड दिवसाच्या कार्यक्रमात खालील सत्रांचा समावेश असेल –
– ज्येष्ठ गिर्यारोहक ‘क्रिस्तोफ वैलेकी’ यांची मुलाखत आणि सादरीकरण
– ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ‘प्रवीणजी भोसले’ यांचे सादरीकरण
– गिरिमित्र सन्मान प्रदान सोहळा
– छायाचित्र आणि स्केचिंग स्पर्धा निवडक कलाकृती प्रदर्शन
– अभ्यासपूर्ण सादरीकरणे (विषय – हिमालय आणि सह्याद्रीतील गिरिभ्रमण, गिर्यारोहण, प्रस्तरारोहण आणि किल्ले)
– गिरिमित्र संमेलन विशेष आढावा अहवाल:
वर्षभरातील प्रस्तरारोहण आणि हिमालयीन मोहिमा
वर्षभरातील बचाव (रेस्क्यू) मोहिमा
दुर्ग संवर्धन मोहिमा (निवडक)
– फिल्म, रील आणि अनुभव कथन स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त सादरीकरणे
– बोल्डरिंग आणि डायनो (क्लाइंबिंग) स्पर्धेचा प्रत्यक्ष व्यासपीठावरील थरार
– सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण
– गिर्यारोहण विषयक साहित्य विक्री स्टॉल
– इतिहास, भ्रमंती विषयक पुस्तकांचे विक्री स्टॉल
आणि या सगळ्यासोबत महाराष्ट्रातील तमाम गिरिमित्रांना भेटण्याची संधी !
संमेलनाची नोंदणी सुरु झाली आहे.
संमेलन प्रवेशिका देणगी मूल्य रु. ७५०/- फक्त ज्यामध्ये दि १३ जुलै – चहा, भोजन आणि दि १४ जुलै – चहा, नाश्ता, भोजन, चहा यांचा समावेश आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संमेलन प्रवेशिका वितरणात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील.
ऑनलाईन माध्यमातून देणगी प्रवेशिका मिळविण्यासाठी पाहा – https://girimitra.org/en/entry-pass-booking/
देणगी प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण –
महाराष्ट्र सेवा संघ, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग,अपना बाजारच्या वर, मुलुंड (प), मुंबई – ४०००८०
वेळ:
सोमवार ते शनिवार (सकाळी १०.३० वा ते सायं ७.३० वा), रविवार (सकाळी १०.३० वा ते १२.३० वा), साप्ताहिक सुट्टी – गुरुवार
देणगी प्रवेशिकांबाबत अधिक माहितीसाठी संपर्क:
श्रीकर पिसोळकर – ९८६९७९०१४६, ऋतुजा अधिकारी – ७०३९५५३९६९
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ट्रेकर्स ब्लॉग, रील, फोटोग्राफी, फिल्म, स्केचिंग, अनुभवकथन आणि बोल्डरींग या स्पर्धा घोषित करण्यात आल्या आहेत. या सर्व स्पर्धांच्या माहितीकरिता भेट द्या – https://girimitra.org/mr/competitions-mar/
हे सगळं अनुभवयाला, ऐकायला, बघायला भेटूया दि.१३ व १४ जुलै रोजी आपल्या नेहमीच्या हक्काच्या ठिकाणी. २१ व्या गिरिमित्र संमेलनाची आयोजक संस्था आहे ‘माऊंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली MAD’. सर्व कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत.
मग वाट कसली पाहताय, नाव नोंदणी सुरु झाली आहे. संमेलन नोंदणी आणि स्पर्धामध्ये सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद द्या. हा योग वर्षातून एकदाच येतो हे लक्षात असूद्या.
सर्व गिरिमित्रांना प्रेमाचं निमंत्रण
आपला डोंगरमित्र,
सतीश गायकवाड
संमेलन प्रमुख, २१ वे गिरिमित्र संमेलन
https://www.facebook.com/events/343705805416753/