एक पाऊल – जागरूकतेकडे !!
पुणे भटकंती कट्ट्याने 17 व्या भटकंती कट्ट्याला Leave No Trace हा भटकंती साठी अत्यंत महत्वाचा असलेला विषय जाहीर केला आणि ह्या विषयाच्या निवडीसाठीच अनेक भटक्यांनी अतिशय उस्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी पडणाऱ्या पावसाला न जुमानता पुणेकर भटके आपल्या हक्काच्या कट्ट्यावर उपस्थित होते. इंद्रजित पवार ह्या Wildlife क्षेत्रात गेली 19 वर्षे कार्यरत असलेल्या आणि व्यवसायाने Outdoor Professional असलेल्या गिर्यारोहक मित्राची वक्ता म्हणून निवड इथेच ह्या कट्ट्याचं यश निश्चित झालं होतं. कट्ट्याची सुरुवात गिरीमित्र संमेलनात पारितोषिक मिळालेल्या “निसर्गमित्र पनवेल” संस्थेच्या “टीम” ह्या प्रबळगड लिंगीच्या चढाईचा थरार दाखवणाऱ्या फिल्मने झाली आणि त्यानंतर सुरू झाला खरा कट्टा !!
इंद्रजितने Leave No Trace च्या 7 तत्वांची तपशीलवार माहिती देणारं सादरीकरण सुरु केलं आणि भटक्यांच्या मैफिलीला रंग चढू लागले. निसर्गात फिरताना पालन करायच्या गोष्टी, त्याचे निसर्गावर होणारे दूरगामी परिणाम, इतर भटक्यांशी वागताना पाळायची तत्वे इत्यादी मुद्दे अतिशय सोप्या रीतीने इंद्रजितने मांडले. Leave No Trace ची तत्व आपण नकळतपणे कशी डावलतो आणि त्याचे परिणाम येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना कसे भोगायला लागू शकतात ह्याचं सुंदर सादरीकरण इंद्रजितने केलं. उपस्थित भटक्यांची उस्फूर्त उपस्थिती आणि त्यांनी विचारलेले प्रश्न ह्यामुळे कट्ट्याला अजूनच रंगत आली. कट्टा संपताना खास मुंबईवरून कट्ट्याला उपस्थिती लावलेल्या सूरज मालुसरे ह्याने Adventure Insurance ह्या अतिशय महत्वाचा विषयाची माहिती दिली आणि कट्टा संपन्न झाला.
ह्या कट्ट्याला जमलेल्या सर्व भटक्यांचे तसेच इंद्रजित व सूरज ह्या मित्रांचे कट्ट्यातर्फे विशेष आभार.
आणि हो, ऑगस्टचा भटकंती कट्टा हा सह्याद्रीतील गिर्यारोहणावर एका अतिशय वेगळ्या पध्दतीने प्रकाश टाकणारा असून हा अतिशय हटके विषय आपल्यातलाच एक कसलेला भटका एका अनोख्या पद्धतीने मांडणार आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भटकंती कट्ट्यावर.
https://www.facebook.com/onkar.oak/posts/2227591327290401
पुणे भटकंती कट्टा – जुलै 2019
“सध्या सह्याद्रीमध्ये खूप गर्दी वाढली आहे”
“आम्ही परवा त्या गडावर गेलो होतो तिथे इतका कचरा केला होता लोकांनी”
“ते गाववाले सांगत होते…तो ग्रुप मोठ्यांदा गाणी लावून गोंगाट करत होता”
सध्या ह्या सगळ्या वाक्यांची आपल्या कानांना जणू सवयच झाली आहे. अनेकदा तोकडा अनुभव किंवा निसर्गात वावरण्याच्या जबाबदारीचे भान नसल्याने सह्याद्रीतील अनेक जागा आज अराजकतेचे भक्ष्य बनल्या आहेत. पण निसर्गात फिरताना “Leave no Trace” अर्थात LNT ची तत्त्व माहीत नसल्याने ह्या समस्या उद्भवतात आणि त्याचा दूरगामी परिणाम होतो.
आणि म्हणूनच पुणे भटकंती कट्टा घेऊन आला आहे एक अत्यंत महत्वाचा आणि अतिशय माहितीपूर्ण असा विषय !! ज्याचं पालन प्रत्येक जबाबदार भटक्याने केलंच पाहिजे. नक्की काय आहेत ही Leave No Trace ची Principles ?? ती फॉलो करताना काय काळजी घ्यावी ?? निसर्गात फिरताना आपल्याकडून नकळत होणाऱ्या चुका कश्या टाळाव्यात ह्यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आपल्यातलाच एक अनुभवी गिर्यारोहक मित्र – इंद्रजित पवार. तेव्हा न चुकता शनिवार राखून ठेवा आणि हा अतिशय महत्वाचा विषय समजून घ्या. कट्ट्याचे डिटेल्स पुढीलप्रमाणे.
पुणे भटकंती कट्टा – जुलै 2019
विषय – Leave No Trace
वक्ता – इंद्रजीत पवार – गिर्यारोहक व आऊटडोअर एक्स्पर्ट
तारीख : शनिवार दिनांक 20 जुलै 2019
वेळ – संध्याकाळी 7 ते 8.30
स्थळ : इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे पुलाजवळ, राजेंद्रनगर, पुणे 30
प्रवेश विनामूल्य
पोस्टर डिझाईन – देवा घाणेकर
#भेटूकट्ट्यावर
त्यानेच घडवलं…त्यानेच शिकवलं
त्यानेच सृष्टी दाखवली आणि त्यानेच दृष्टी दिली…
पण आपण परतफेड करायला चुकतोय का ??
सह्याद्री… हिमालय आणि निसर्ग ह्या त्रिमूर्ती गुरूंनी आज अनेक पिढ्या घडवल्या. डोंगरात कसं वागावं ह्याचे अनेक धडे दिले पण आपण ते सोयीस्करपणे विसरत चाललोय का ?? सह्याद्रीतली आणि एकूणच निसर्गातली सध्याची बीभत्स आणि बेशिस्त अराजकता बघता ह्या गुरूंना आपण गुरुदक्षिणा द्यायला कमी पडतोय का…खरंच दोन मिनिटं विचार करून बघा !!
शनिवारचा कट्टा हा कुठेतरी त्या गुरुदक्षिणेची पायाभरणी ठरणार आहे. “पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका” हे एकच तत्व जरी कायम पाळलं तरी खूपसे प्रश्न मार्गी लागणार आहेत. Leave no Trace ची ही मार्गदर्शक तत्व आपल्याला खूप काही शिकवून जातील आणि आपल्यातला शिष्य नव्याने घडवतील…तेव्हा हा कट्टा अजिबात चुकवू नका…
पुणे भटकंती कट्टा – जुलै २०१९
विषय: Leave No Trace
वक्ता: इंद्रजित पवार (गिर्यारोहक व outdoor expert)
दिनांक: शनिवार, २० जुलै २०१९
वेळ: सायंकाळी ७ ते ८.३०
ठिकाण: इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे ब्रिजजवळ, राजेंद्र नगर, पुणे
टीप : कट्टा सुरू होण्यापूर्वी गिर्यारोहण विषयाशी संबंधित एक थरारक फिल्म दाखवली जाणार आहे तरी सर्वांनी वेळेपूर्वी हॉलवर उपस्थित रहावे.